मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला राजगड किल्ल्याचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचेही नाव बदलले आहे. आता अहमदनगर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ या नावाने ओळखले जाणार आहे. तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळाने आज (13 मार्च) आठ मुंबई रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा देखील निर्णय घेतला ज्यांची नावे ब्रिटिश वसाहती काळातील आहेत.
या निर्णयानंतर करी रोडचे नाव लालबाग, सँडहर्स्ट रोडचे नाव डोंगरी आणि मरीन लाइन्सचे नाव मुंबादेवी, कॉटन ग्रीनचे नाव बदलून काळाचौकी, चर्नी रोडचे नाव गिरगाव, डॉकयार्ड रोडचे नाव माझगाव, किंग सर्कलचे तीर्थकर पार्श्वनाथ आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाना जगन्नाथ शंकर शेट असे नामांतर करण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळाने आज या आठ मुंबई रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच मंत्रिमंडळाने जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी 2.5 एकर जमीन खरेदी करण्यासही मान्यता दिली आहे. त्यासाठीचा अर्थसंकल्पीय प्रस्ताव यापूर्वीच महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच्या अर्थसंकल्पात होता.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळाचे सदस्य उपस्थित होते, असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने एक्स वर पोस्ट केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अहमदाबाद आणि मुंबई सेंट्रल दरम्यानच्या ट्रेनसह 10 हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. याबाबत पंतप्रधान मोदींचे आभार मानताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आज पंतप्रधान मोदींनी 10 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. 10 ट्रेनपैकी एका ट्रेनचे महाराष्ट्रात उद्घाटन करण्यात आले. राज्यातील नऊ स्थानकांना ‘एक स्टेशन, एक उत्पादन’चा फायदा होईल. तसेच यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.”
“यापूर्वी महाराष्ट्राला सात वंदे भारत गाड्या मिळाल्या होत्या. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो,” असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.