आज दुपारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशवासियांना खास पत्र लिहिले आहे. या पत्रातून मोदी यांनी गेल्या दहा वर्षांबाबत भाष्य केले आहे. तसेच गेल्या काही वर्षांत आपल्या सरकारने कोणत्या योजना राबवल्या आणि कोणत्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या? याबाबतची माहिती पीएम मोदींनी पत्राद्वारे दिली आहे.
आपल्या पत्रात पंतप्रधान लिहितात ,” माझ्या प्रिय कुटुंबियांनो, तुम्ही मला साथ दिली त्याला आता एक दशक पूर्ण होत आहे. माझ्या 140 कोटी लोकांच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचा विश्वास, सहकार्य आणि पाठिंब्याचे हे मजबूत नाते माझ्यासाठी किती खास आहे हे शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.माझ्या कुटुंबीयांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल हेच मागच्या 10 वर्षातील आमच्या सरकारचे यश आहे. आम्ही प्रत्येक धोरण, निर्णय या माध्यमातून गरीब, शेतकरी, युवक आणि महिलांच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा, त्यांना अजून सशक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेत” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे.
विकास आणि वारसा सोबत पुढे घेऊन जाणाऱ्या भारताने मागच्या एक दशकात पायाभूत सुविधांचे अभूतपूर्व निर्माण पाहिले समृद्ध संस्कृती आणि परंपरेसोबत पुढे जाणाऱ्या देशाचा आज प्रत्येक देशवासियाला अभिमान आहे” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
गरीब, महिला आणि शेतकऱ्यांसाठी धोरण राबवले,पायाभूत सुविधांची निर्मिती केली, 370 कलम, तिहेरी तलाक याबाबत निर्णय घेतले जीएसटी लागू करणे, दहशतवादाला सडेतोड उत्तर, संसदेत महिलांसाठी नारी शक्ति वंदन अधिनियम, नवीन संसद भवनाची निर्मिती यांसारखे मोठे निर्णय मी तुमच्या माझ्यावरच्या आणि सरकारवरच्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळे घेऊ शकलो असे पंतप्रधान म्हणाले आहेत.
विकसित भारताच्या निर्माणाचा संकल्प घेऊन आपण पुढे जात आहोत. त्यासाठी मला तुमचे विचार, सूचना आणि सहकार्याची आवश्यकता आहे. तुमचा आशीर्वाद आणि समर्थन मला मिळत राहील. राष्ट्रनिर्माणसाठी प्रयत्न न थकता सुरु राहतील. ही मोदींची हमी आहे” असे आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.