राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) भारतातील ISIS मॉड्यूल प्रकरणात प्रायोजित दहशतवाद आणि त्यातून मिळालेल्या पैशांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एनआयएने पुण्यातील कोंढवा भागात याप्रकरणी नवी कारवाई केली आहे. ज्यामध्ये ‘दहशतवादातून मिळालेल्या उत्पन्नातून’ केलेल्या चार मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी कोंढवा परिसरातील चार मालमत्ता जप्त केल्या आहेत. कोंढवा येथे आयएसआयएसशी संबंधित स्फोटके, बॉम्ब, शस्त्रे आणि साहित्य जप्त केल्याप्रकरणी तपास यंत्रणेने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी 11 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
एनआयएच्या कारवाईबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, “कोंढव्यातील मिठा नगर भागात असलेल्या चार मालमत्ता एनआयएने दहशतवादाच्या उत्पन्नाच्या आधारे जप्त केल्या आहेत. ही कारवाई पुणे आयएसआयएस मॉड्यूलच्या संदर्भात करण्यात आली आहे, ज्याचा भंडाफोड करण्यात आला होता.”
याआधी 18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी मोहम्मद युनूस, मोहम्मद याकूब साकी आणि मोहम्मद इम्रान, मोहम्मद युनूस खान यांना कोथरूड परिसरातून वाहन चोरीचा प्रयत्न करताना अटक केली होती. मात्र, त्याचा साथीदार मोहम्मद शाहनवाज आलम शफीउज्जमा खान फरार झाला होता. तपास अहवालात असे म्हटले आहे की, खान आणि साकी यांच्यावर पुण्याच्या आसपासच्या जंगलात बॉम्बची चाचणी केल्याचा आरोप आहे, तर आरोपींपैकी एक झुल्फिकार अली बडोदावाला याने बॉम्ब बनवण्याच्या ‘वर्कशॉप’चे प्रशिक्षण दिले होते.
खान आणि साकी गेल्या 16 महिन्यांपासून पुण्यातील कोंढवा परिसरात लपून बसले होते आणि त्यांनी साताऱ्यातील एका साडी दुकानाच्या मालकाला लुटले होते आणि बॉम्ब बनवण्यासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे वापरले होते, असे महाराष्ट्र एटीएसने बुधवारी सांगितले.
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या महाराष्ट्र एटीएसने आरोपींकडून रासायनिक पावडर, ड्रोन कॅमेरा, बॉम्ब बनवण्यासाठी वापरलेली उपकरणे, दोन पिस्तूल, पाच राऊंड, एक कार आणि मोठ्या प्रमाणात डेटा यासह अनेक गुन्हेगारी वस्तू जप्त केल्या आहेत. याशिवाय त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली असून, त्यात दक्षिण मुंबईतील चबड हाऊसची छायाचित्रे आहेत, जिथे 2611चा दहशतवादी हल्ला झाला होता.