काही दिवसांपूर्वी अॅड. असिम सरोदे यांनी शिवसेनेतील 12 आमदार ठाकरे गटात परतणार असल्याचा दावा केला होता. तर या दाव्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं अॅड. असिम सरोदे यांना नोटीस पाठवली आहे. तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्यावर दोन दिवसांमध्ये माफी मागा नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.
अॅड. असिम सरोदे यांनी चंद्रपूर येथील ‘निर्भय बनो’ या सभेत बोलताना शिंदे गटाच्या आमदारांबाबत एक विधान केले होते. शिंदे गटातील 12 आमदार ठाकरे गटात परतणार असल्याचा दावा असिम सरोदे यांनी केला होता. तसेच त्यांनी त्या बारा आमदारांची यादी देखील वाचून दाखवली होती.
असिम सरोदे यांनी ठाकरे गटात जाणाऱ्या आमदारांची नावे वाचून दाखवली होती. यामध्ये आमदार श्रीनिवास वनगा, लता सोनावणे, चिमणराव पाटील, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, उदयसिंह राजपूत, बालाजी कल्याणकर, महेश शिंदे, प्रदीप जयस्वाल आणि प्रकाश आबिटकर हे आमदार ठाकरे गटात जाण्यास इच्छुक असल्याचे सरोदे यांनी सांगितले होते.
आता याप्रकरणी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत सरोदेंना नोटीस पाठवली आहे. दोन दिवसांमध्ये माफी मागा नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. तसेच आमदार बालाजी कल्याणकर यांनी हा दावा दाखल केला आहे.