स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने रविवारी झालेल्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा तीन चेंडू बाकी असताना आठ गडी राखून पराभव करून महिला प्रीमियर लीग (WPL) च्या दुसऱ्या टप्प्यातील विजेतेपद पटकावले. चांगली सुरुवात करूनही दिल्ली कॅपिटल्सने यंदाही आरसीबीच्या फिरकीपटूंना बळी पडून ते जेतेपदाला मुकले.
आरसीबी महिला संघाची ही पहिलीच फायनल होती आणि संथ सुरुवातीनंतर त्यांनी दबावाला तोंड देत शेवटी विजय मिळवला. आरसीबीच्या गोलंदाजीसमोर दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे 18.3 षटकांत फक्त 113 धावा झाल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आरसीबीने दमदार अशी खेळी करत 19.3 षटकांत दोन गडी गमावून 115 धावा करून विजेतेपद पटकावले.
संरिचा घोषने (नाबाद 17, 14 चेंडू, दोन चौकार) संघासाठी विजयी चौकार ठोकले. तर मंधानाने 39 चेंडूंत 31 धावांची खेळी खेळली आणि सोफी डिव्हाईनने 27 चेंडूंत पाच चौकार व एक षटकारासह 32 धावांचे योगदान दिले. एलिस पेरी 35 धावा करून नाबाद राहिली. दुसरीकडे, नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने सलामीवीर शेफाली वर्मा (44 धावा) आणि कर्णधार मेग लॅनिंग (23 धावा) यांच्या खेळीच्या जोरावर 43 चेंडूत विकेट न गमावता 64 धावा करत चांगली सुरुवात केली. पण यानंत संघाने अवघ्या 49 धावांत सर्व 10 विकेट गमावल्या.