दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का बसला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज (18 मार्च) त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता त्यांना तातडीने शरण जावे लागणार आहे. सध्या ते प्रकृतीच्या कारणास्तव अंतरिम जामिनावर होते.
न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सत्येंद्र जैन यांना ईडीने मे 2022 मध्ये अटक केली होती. तर न्यायालयाने त्यांना 26 मे 2023 रोजी वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर केला होता. नंतर सहा आठवड्यांसाठी त्यांना सोडण्यात आले, परंतु नंतर त्याचा कालावधी हळूहळू वाढला. या काळात सर्वोच्च न्यायालयाने सत्येंद्र जैन यांना प्रसारमाध्यमांसमोर वक्तव्ये करण्यास आणि राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्यास मनाई केली होती.
ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाला जैन यांना जामीन देण्याची विनंती केली होती आणि साक्षीदारांना कोणताही धोका नसल्याचे सांगितले होते. तर दुसरीकडे माजी मंत्र्याच्या जामीन याचिकेला विरोध करताना ईडीने सांगितले होते की, जेव्हा जेव्हा त्यांना तुरुंगातून बाहेर यायचे असते तेव्हा ते वैद्यकीय आधारावर जामीन घेतात.
दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी सत्येंद्र जैन यांनी नियमित जामिनासाठी केलेला अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल आहे. सोबतच त्यांच्या इतर याचिका देखील कोर्टाने फेटाळून लावल्या आहे. तसेच आता त्यांना तातडीने आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे जैन यांना पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे.