सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील दिल्लीला गेले आहेत. तर आज (19 मार्च) सकाळी राज ठाकरे यांची भाजप नेते विनोद तावडे यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर राज ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली. या भेटीदरम्यान अमित ठाकरे देखील उपस्थित होते.
राज ठाकरे हे भाजपसोबत युती करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे राज ठाकरे हे दिल्लीला गेले असल्याचं म्हटलं जात आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-मनसे युती करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात असल्याचं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची अमित शाह यांच्यासोबत आज बैठक पार पडली आहे.
या भेटीनंतर अमित ठाकरे यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे फोटो पोस्ट करत त्यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह साहेब यांची भेट घेतली. मलाही या ग्रेट-भेटीचा साक्षीदार होता आलं!”, असं अमित ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलं आहे.
https://www.facebook.com/amitthackerayofficial/posts/976127120549975?ref=embed_post
अमित ठाकरे यांच्यासोबतच राज ठाकरे यांनी देखील अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. “आज केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दिल्लीत भेट झाली”, असे राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीनंतर राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.