माजी पोलीस आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई हायकोर्टाने प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता रद्द केली आहे. तसेच त्यांना 2006 च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
2006 च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणातील 12 आरोपींना ट्रायल कोर्टाने ठोठावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. तसेच ट्रायल कोर्टाने 13 अन्य आरोपींना दोषी ठरवले होते आणि प्रदीप शर्मा यांनी निर्दोष मुक्तता केली होती. पण मुंबई हायकोर्टाने शर्मा यांची निर्दोष सुटका रद्द केली आहे आणि पुराव्याच्या मालिकेच्या आधारावर त्यांना दोषी ठरवले आहे.
प्रदीप शर्मा यांच्यासह 13 आरोपींना मुंबई हायकोर्टाने दोषी ठरवले आहे. शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने त्यांना हायकोर्टाकडून मोठा झटका मिळाला आहे.
दरम्यान, प्रदीप शर्मा हे अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील देखील आरोपी आहेत. शर्मा यांची एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख होती. ते 1983 मध्ये पोलीस सेवेत रूजू झाले होते. त्यांच्या नावावर 100 हून जास्त चकमकींचा विक्रम आहे. तर प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला होता.
25 फेब्रुवारी 2021 रोजी प्रदीप शर्मा हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घरातील अँटिलिया बाहेर स्फोटक पदार्थ सापडल्याच्या प्रकरणी चर्चेत आले होते. याप्रकरणी त्यांनी अटक करण्यात आली होती.