देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान सत्ताधारी एनडीए आणि ‘इंडी’ आघाडीने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. दरम्यान, आतापर्यंत भाजपाने आपल्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सातारा लोकसभेमध्ये अजून उमेदवार दिला नसल्याने खासदार उदयनराजे भोसले नाराज असल्याचे चर्चा आहे. या सर्व घडामोडी घडत असताना उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये तब्बल २ तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात अजूनही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यातच भाजपाने जाहीर केलेल्या यादीमध्ये उदयनराजे भोसले नाव नसल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. यावेळी उदयनराजे भोसले देखील नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यातच आता देवेंद्र फडणवीसांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. या भेटीत काय चर्चा झाली हे समोर आली नसली तरीही, सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, भाजपाने आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. त्या उदयनराजे भोसले यांचे साताऱ्यामधून नाव नसल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. महायुतीचे जागावाटप अजून जाहीर झालेले नाहीये. मात्र अनेक ठिकाणी महायुतीमध्ये अनेक जागांवरून चढाओढ पाहायला मिळत आहे. दरम्यान, काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यामुळे आता मनसे देखील महायुतीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. तसेच आता पुढील यादीमध्ये उदयनराजे यांचे नाव असणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.