2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections 2024) काँग्रेसने (Congress) महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एक दिवस आधी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत पक्षाने महाराष्ट्रातील 19 जागांवर चर्चा केली होती. यानंतर काँग्रेसच्या तिसऱ्या यादीची प्रतीक्षा होती. काँग्रेसने सात जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महाराष्ट्रासाठी जाहीर केलेल्या सात नावांमध्ये माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांच्या नावाचाही समावेश आहे. तसेच पक्षाने मुंबईतील एकाही जागेसाठी उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही.
लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवाराचे नाव
1. नंदुरबार- अधिवक्ता गोवळ पाडवी
2. अमरावती- बळवंत वानखेडे
3. नांदेड- वसंत चव्हाण
4. पुणे-रवींद्र धंगेकर
5. लातूर-डॉ. शिवाजीराव काळगे
6. सोलापूर-प्रणिती शिंदे
7. कोल्हापूर-शाहू महाराज छत्रपती
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 12 जागांची निश्चिती झाली होती, मात्र पक्षाने 57 उमेदवारांच्या तिसऱ्या यादीत केवळ सात उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी अनुक्रमे 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी पाच टप्प्यात निवडणुका होणार असून मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.
राज्यात निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्षाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसने सात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.