दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल CM Arvind Kejriwal) हे अडचणीत सापडले आहेत. त्यांना काल (21 मार्च) रात्री ईडीने (ED) चौकशी करत अटक केली. त्यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच विरोधी पक्षांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर निशाणा साधत अरविंद केजरीवाल यांची अटक चुकीची असल्याचे म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले, अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक चुकीची आहे. याआधीही राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. राज्यात धोरण ठरवणाऱ्या राज्याच्या प्रमुखाला अटक करणे हे किती चुकीती गोष्ट आहे. भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे.
भाजपकडून निवडणुकीच्या काळात भीती पसरवण्याचे काम सुरू आहे. आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. उद्या हे कोणाला अटक करतील काही सांगता येत नाही, अशी टीकाही शरद पवारांनी केली.
अरविंद केजरीवाल दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात ही अटकेची मोठी कारवाई करण्यात आली आहे. पण भाजपला याची किंमत मोजावी लागेल. तसेच जरी केजरीवाल यांच्यावर कारवाई केली असेल तरी त्याचा फायदा केजरीवालांच्या पक्षाला होईल. त्यांच्या सर्व जागा निवडून येतील आणि दिल्लीची जनता केजरीवालांच्या पाठिशी उभी राहिल, असेही शरद पवार म्हणाले.