रंगांचा सण असलेल्या होळीच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यासाठी ऑनलाइन मार्केटपासून मॉल्स आणि दुकाने सर्व काही सज्ज आहे. देशभरात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाचा उद्योगक्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. यंदा होळीच्या दिवशी ५० हजार कोटींहून अधिक व्यवसाय होऊ शकतो, असा विश्वास व्यावसायिकांच्या संघटनेने व्यक्त केला आहे.
यावेळी होळीमध्ये आणखी एक खास बाब पाहायला मिळत आहे ती म्हणजे बाजारात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जात आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघ अर्थात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट ) असा दावा केला आहे की, गेल्या वर्षीप्रमाणेच याही वेळी व्यापारी आणि सामान्य खरेदीदार चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार घालत आहेत. देशात होळीशी संबंधित वस्तूंची आयात साधारणपणे 10 हजार कोटी रुपयांच्या आसपास असते जी यावेळी पूर्णपणे नगण्य दिसून येत आहे.
कॅटच्या म्हणण्यानुसार यंदा होळीसाठी बाजारपेठेतील वातावरण अतिशय अनुकूल आहे. त्यामुळे यंदा होळीच्या सणासुदीच्या काळात देशभरातील व्यवसायात सुमारे 50 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. होळीच्या सणानिमित्त देशभरात ५० हजार कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय होऊ शकतो. एकट्या दिल्लीत ५ हजार कोटींहून अधिकचा व्यवसाय अपेक्षित आहे.
यावेळी विविध प्रकारची पिचकारी, फुगे आणि इतर आकर्षक वस्तू बाजारात आल्याचे सीएआयटीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले आहेत. . प्रेशर स्प्रे 100 ते 350 रुपयांना मिळतात. याशिवाय फॅन्सी पिचकाऱ्याही बाजारात आल्या आहेत. स्पायडर मॅन, छोटा भीम आदी प्रकार बच्चेकंपनीला आकर्षित करत आहे. तसेच गुलाल शिंपडता येणाऱ्या पिचकाऱ्यांनाही चांगली मागणी आहे.
कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले, “यावेळी होळीच्या सणासुदीत चिनी बनावटीच्या वस्तूंवर व्यापारी आणि ग्राहकांकडून बहिष्कार टाकला जात आहे. बाजारातही फक्त भारतीय बनावटीचे हर्बल रंग आणि गुलाल, पिचकारी , फुगे इत्यादी उपलब्ध आहेत. चंदन , पूजा साहित्य, पोशाख आणि इतर उत्पादने मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. मिठाई, सुका मेवा, भेटवस्तू, फुले व फळे, कपडे, किराणा, FMCG उत्पादने, ग्राहकोपयोगी वस्तू आणि इतर उत्पादनांनाही बाजारात मोठी मागणी आहे.