भूतानचे (Bhutan) पंतप्रधान शेरिंग तोबगे (PM Shering Tobgay) यांनी रविवारी आपले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी खराब हवामान आणि व्यस्त वेळापत्रक असूनही हिमालयीन राष्ट्राला भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले आहे की, “आमचे भाऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या देशाला भेट दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला भेटण्याचे वचन दिले होते. तसेच त्यांचे व्यस्त वेळापत्रक आणि खराब हवामान त्यांना हा दौरा पूर्ण करण्यापासून रोखू शकले नाही. ही फक्त #ModiKaGuarantee आहे.”
भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी शनिवारी भारताकडे रवाना झाले. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे पंतप्रधान तोबगे यांच्यासह आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोदींना निरोप देण्यासाठी आले होते.
यादरम्यान भूतान दौऱ्याबाबत पीएम मोदींनी X वर पोस्ट शेअर करत लिहिले की, “महामहिम भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे दिल्लीला जाताना मला निरोप देण्यासाठी विमानतळावर आल्याने माझा गौरव झाला आहे. भूतानची ही खूप खास भेट आहे. मला भूतानचे राजा, पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि भूतानच्या इतर प्रतिष्ठित लोकांना भेटण्याची संधी मिळाली. आमच्या संवादांमुळे भारत-भूतान मैत्री आणखी घट्ट होईल. ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो बहाल केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.”
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, भारत आणि भूतानमधील लोकांमधील जवळीक त्यांच्या द्विपक्षीय संबंधांना अनोखी बनवते. भूतानच्या लोकांच्या हृदयात ‘भारत’ आहे. भूतानच्या लोकांनी त्यांच्या सुंदर देशात केलेल्या “संस्मरणीय स्वागतासाठी” मी कृतज्ञ आहे. भारत-भूतान मैत्री यापुढेही नव्या उंचीवर पोहोचेल, अशी आशाही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.