होळी (Holi) म्हटली की डोळ्यासमोर सर्वात पहिले येते ती रंगाची उधळण. होळीची कथा आणि महाराष्ट्रात कशा प्रकारे ती साजरी होते हे आपण जाणून घेणार आहोत. खरं तर होळी हा सण भारतात सगळीकडेच साजरा करण्यात येतो. वेगवेगळ्या ठिकाणी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने ही होळी साजरी केली जाते. ‘आला होळीचा सण आला चल नाचूया’ असं म्हणत आपण सगळेच होळी आणि धुळवडीला रंगामध्ये न्हाऊन निघतो. होळीची पूजा, दुसऱ्या दिवशीची धुळवड आणि खरं तर अजूनही गावाकडे जपली जाणारी परंपरा म्हणजे अर्थातच पाच दिवसांनी म्हणजे पंचमीला साजरी होणारी रंगपंचमी.
एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी होळीची आख्यायिका प्रचलित आहे.
होळी हा प्रकर्षाने उत्तर भारतात अधिक प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. या होळीच्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, फाग, फागुन “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी ओळखले जाते.तर कोकणात शिमगो म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला “फाल्गुनोत्सव”,आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त “वसंतागमनोत्सव” किंवा “वसंतोत्सव” असेही म्हणण्यात येते.
महाराष्ट्रामध्ये होळीच्या दिवशी लाकडे मंत्रोच्चारासह दहन करण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती आलेले संकट दूर होवो यासाठी बोंबा मारत फिरण्याची पद्धत आहे. आजही ही पद्धत आपल्याकडे तशीच अविरत आहे. अनेकजण होळीच्या शुभेच्छा यादिवशी देत असतात. महाराष्ट्रात घराघरामध्ये पुरणपोळीचा नेवैद्य दाखवला जातो. तर यादिवशी होळीला नारळ अर्पण करून आपल्यावर कोणतेही संकट न येवो यासाठी प्रार्थनाही केली जाते. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला’ धुळवड’ असेही म्हणतात. यामध्ये झाडाची सुकलेली पाने गळून सृष्टीला नवी पालवी फुटत असते. त्यामुळे निसर्गातही रंगाची उधळण सुरू असते. एकमेकांना रंग लावत आनंद साजरा करत भांग पिण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे.
– धनश्री भालेराव