लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपावरून अद्यापही काही जागांवरील तिढा सुटलेला नाही. त्यात महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडी या पक्षाला सामावून घेण्यातही यश आलेलं नाही. तसेच मविआने प्रकाश आंबेडकरांना चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. पण, हा प्रस्ताव आंबेडकरांनी फेटाळला आहे. अशातच आता प्रकाश आंबेडकरांनी मोठी घोषणा केली आहे.
आज (24 मार्च) प्रसार माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी मोठी घोषणा केली. “मी अकोला मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती आंबेडकरांनी दिली आहे.
“मी माझ्या पक्षाच्या वतीने 27 मार्च रोजी अकोला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यापूर्वी 26 मार्चला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी वंचित बहुजन आघाडीला 4 जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीने दिला असल्याचे सांगितले होते. याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी त्यांना त्यांच्या चार जागा परत देतो. त्यांनी त्या जागा लढवाव्या. संजय राऊत हे चार जागा म्हणत असले तरी त्यांनी बैठकीला गेल्यानंतर एक अकोला आणि दोन दुसऱ्या जागा अशी तीन जागांसंदर्भात सहमती दर्शवली होती. त्यामुळे खोटं बोलणं थांबलं पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.