शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती (Baramati) लोकसभा मतदार संघाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबच विजय शिवतारेंच्या दोन वेळा बैठका झाल्या. त्यानंतर आज (24 मार्च) त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. शिवतारेंनी बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
माध्यमांशी बोलताना विजय शिवतारेंनी सांगितले की, आपण बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहे. 12 एप्रिलला 12 वाजता आपण लोकसक्षेचा अपक्ष अर्ज भरणार आहे. शिवतारेंच्या या निर्णयानंतर आता बारामतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. आता सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे यांच्यात लढाई होणार आहे.
पुढे विजय शिवतारे म्हणाले की, सर्व पक्षीय नेते जाहीरपणे नाही पण मनातून माझ्यासोबत आहेत. मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनाही सांगतो की त्यांनी मला आशीर्वाद द्यावे. मी 1 तारखेला सभा घेणार आहे. माझी लढाई म्हणजेच जन सामान्यांची लढाई असणार आहे. त्यामुळे या सभेला 50 ते 60 हजार लोकांची उपस्थिती असणार आहे. त्यानंतर मी सगळ्या सभा विधानसभा मतदार संघात घेणार आहे.
अजित पवारांवर टीका करताना विजय शिवतारे म्हणाले, अजित पवारांचे राजकारण हे स्वार्थाचे आहे. लोक मला सांगत आहेत की माघार घेऊ नका. त्यामुळे आता मतदार संघातून पवार रूपी हुकुमशाही संपवण्यासाठी माझे धर्मयुद्ध आहे, असेही शिवतारे म्हणाले.