काल (24 मार्च) सर्वत्र होळीचा (Holi) सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. पण दुसरीकडे मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैनच्या (Ujjain) महाकाल (Mahakal) मंदिरात मोठा अपघात झाला आहे. महाकाल मंदिरात भस्म आरती सुरू असताना अचानक आग (Fire) लागली. या आगीत 13 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मंदिरातील सेवकांचा आणि पुजाऱ्यांचा समावेश आहे.
महाकाल मंदिरात भस्म आरती करताना गुलाल उधळल्याने अचानक आग लागली असल्याची माहिती मिळत आहे. तर सुदैवाने या आगीवर नियंत्रणत मिळवण्यात यश आलं आहे. या आगीत मंदिरातील भस्मारतीचे मुख्य पुजारी संजय गुरू, मनोज पुजारी, विकास पुजारी, अंश पुरोहित, चिंतामण गेहलोत आणि सेवक महेश शर्मा यांच्यासह अनेज जण जखमी झाले आहेत. सध्या या जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मंदिरात भस्म आरतीदरम्यान गुलाल वापरला जातो. तर आरतीदरम्यान गर्भगृहात कापूर पेटवण्यात आला आणि गुलालही उधळण्यात आला. त्यामुळे अचानक भीषण आग लागली. या आगीत आरतीसाठी उपस्थित असलेल्यांपैकी 13 जण जखमी झाले असून त्यामध्ये पुजाऱ्यांचाही समावेश आहे. सुदैवानं यात कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही. सर्वांती प्रकृती स्थिर आहे. तसेच या घटनेनंतर मंदिर दर्शन व्यवस्थित सुरू असून कोणतीही समस्या निर्माण झालेली नाही, अशी माहिती उज्जैनचे जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
होळीनिमित्त काल महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यावेळी गर्भगृहात पुजारी आरती करत असताना मागून अचानक कोणीतरी गुलाल उधळला आणि तो दिव्यावर पडला आणि आग लागली. गुलालामध्ये केमिकल असल्यामुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.