लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी जोरात तयारी सुरू केली आहे. सर्व पक्ष आता आपले उमेदवार जाहीर करत आहेत. तर भाजपने (BJP) आता त्यांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचे (Kangana Ranuat) नाव आहे. त्यामुळे आता कंगना रणौत राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपने कंगनाला लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे.
कंगना रणौतला भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी (Mandi) मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सध्या मंडी लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या प्रतिभा सिंह या विद्यमान खासदार आहेत. तर आता भाजपने ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी कंगनाला उमेदवारी दिली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या पाचव्या यादीत महाराष्ट्रातील तीन उमेदवारांची नावे समोर आली आहे. यामध्ये सोलापूरमधून राम सातपुते, भंडारा-गोंदियामधून सुनील मेंढे आणि गडचिरोली चिमूरमधून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमी तिच्या रोखठोक भूमिकांमुळे चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत आली आहे. अशातच आता कंगनाला उमेदवारी मिळाल्याने मंडी मतदारसंघात तिची जादू चालणार की नाही हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.