राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी होळीच्या (Holi) पूर्वसंध्येला नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि म्हटले की हा सण लोकांमध्ये प्रेम, एकता आणि बंधुत्वाची भावना वाढवतो. तसेच राष्ट्रपतींनी रविवारी एका संदेशात म्हटले आहे की, होळीच्या शुभ मुहूर्तावर, मी भारत आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना माझ्या शुभेच्छा देते.
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात होळी सणाची भावना कायम ठेवली आणि त्या म्हणाल्या की, “होळी हा एक चैतन्यमय आणि आनंदाचा सण आहे, जो आपल्या जीवनात आशा आणि उत्साह निर्माण करतो. होळीचे विविध रंग आपल्या देशाच्या विविधतेचे प्रतीक आहेत. हा सण प्रेमाच्या भावनांना प्रोत्साहन देतो आणि लोकांमध्ये एकता आणि बंधुत्वाची भावना वाढवतो. तसेच हा सण आपल्याला आपला सांस्कृतिक वारसा मजबूत करण्यासाठी देखील प्रेरणा देतो.”
“रंगांचा हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद घेऊन येवो आणि आपल्या सर्वांना राष्ट्र उभारणीसाठी नव्या उमेदीने काम करण्यास प्रवृत्त करो,” असेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
राष्ट्रपतींसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रंगांच्या सणानिमित्त लोकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समृद्धी, सौहार्द आणि नवीन ऊर्जा येवो अशा शुभेच्छा दिल्या. अमित शाह यांनी X वर पोस्ट करत म्हटले की, “होळीच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. आनंदाचा हा सण तुम्हा सर्वांच्या जीवनात समृद्धी आणि सौहार्दाचे रंग घेऊन येवो आणि नवीन ऊर्जेच्या प्रसाराचे माध्यम बनो.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रविवारी होळीच्या पूर्वसंध्येला देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी माझ्या देशातील माझ्या सर्व सहकारी नागरिकांना होळीच्या शुभेच्छा देतो. स्नेह आणि सौहार्दाच्या रंगांनी सजलेला हा पारंपरिक सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येवो.”