अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranuat) हिच्याबद्दल काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत (Supriya Shrinate) यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सुप्रिया श्रीनेत यांच्या इन्स्टा अकाऊंटवर कंगना रणौतचा एक अश्लील फोटो पोस्ट करण्यात आला होता. तसंच कंगनाच्या या फोटोला वादग्रस्त कॅप्शन देखील देण्याल आले होते. कंगनाचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर श्रीनेत यांनी ती पोस्ट हटवली. मात्र, या पोस्टमुळे आता सुप्रिया श्रीनेत चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत.
कंगनावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून राष्ट्रीय महिला आयोगाने सुप्रिया श्रीनेत यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. महिला आयोगाने या प्रकरणी एक पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे की, आम्ही सुप्रिया श्रीनेत यांनी केलेल्या पोस्टचा निषेध करतो. एखाद्या महिलेबाबत अशाप्रकारे पोस्ट करणं आणि चुकीच्या गोष्टी पसरवणं ही गोष्ट महिलेचा अपमान करणारी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुप्रिया श्रीनेत यांच्यावर तातडीची कारवाई केली पाहिजे. महिलांचा आदर करणं ही आपली जबाबदारी असून ही समज प्रत्येकाला दिली पाहिजे. सोशल मीडियावर अशा प्रकारची पोस्ट करणं म्हणजे महिलेचा अपमान करणं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी आणि कारवाई करावी, अशी मागणी महिला आयोगाने केली आहे.
कंगनाला लोकसभेसाठी हिमाचल प्रदेशातील मंडीतून तिकीट मिळाले आहे. यावरूनच सुप्रिया श्रीनेत यांच्या इन्स्टाग्रामवरून कंगनाबाबतची आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली. तसेच तिच्या फोटोखाली वादग्रस्त कॅप्शन लिहिण्यात आले. ही पोस्ट टाकल्यानंतर वाद वाढला आणि सुप्रिया यांनी ती पोस्ट इन्स्टावरुन हटवली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने (भाजप) त्याचा स्क्रिनशॉट घेऊन काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला चढवला आणि सुप्रिया अजूनही भाजपच्या निशाण्यावर आहेत.