अमेरिकेत (America) एक धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेतील बाल्टिमोर (Baltimore) शहरातील फ्रान्सिस स्कॉट ब्रिज (Francis Scott Bridge) जहाज धडकल्यामुळे कोसळला आहे. मेरीलँड वाहतूक प्राधिकरणाने याबाबतची माहिती दिली आहे. तसेच सध्या या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ही घटना अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार 1:35 a.m. वाजता घडली. एक मोठे जहाज फ्रान्सिस स्कॉट ब्रिजला धडकल्याने तो ब्रिज काही सेकंदातच कोसळला. यावेळी अनेक वाहने पाण्यात पडली असल्याचं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंगापूरचा झेंडा असलेले 300 मीटर लांबीचे जहाज ब्रिजला धडकल्याने ही घटना घडली आहे. ब्रीज कोसळल्याची घटना घडल्यानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे आता लोकांना वेगळ्या मार्गाने जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बाल्टिमोरच्या महापौरांनी सांगितले की, या घटनेची माहिती त्यांना मिळाली आहे. तसेच सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या आपघातामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. तर या अपघातात काही कर्मचारीही पाण्यात पडल्याची माहिती समोर आली आहे.
बाल्टिमोर बचावकार्य विभागाचे प्रमुख केविन कार्टव्राईट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेदरम्यान कमीत कमी सात लोक पाण्यात पडले आहेत. सध्या त्यांचा शोध घेतला जात आहे. ज्यावेळी जहाज धडकले त्यावेळी अनेक वाहने ब्रीजवरती होती. त्यामुळे या घटनेत किती जीवितहानी झाली हे आत्ताच सांगता येणार नाही. पण, लोकांना वाचवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.