पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे एक मोठा आत्मघातकी हल्ला झाला आहे. शांगला जिल्ह्यात बेशम इथे झालेल्या या हल्ल्यात पाच चिनी नागरिकांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिनी नागरिकांच्या वाहनांना लक्ष्य करुन हा आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे.
मलाकंदच्या पोलिस उपमहानिरीक्षकांनी सांगितले की, हल्लेखोरांनी त्यांची स्फोटकांनी भरलेली कार ज्या वाहनात चिनी नागरिक प्रवास करत होते त्या वाहनाला धडकवली . चिनी नागरिक हे अभियंते होते, जे इस्लामाबादहून दासू कॅम्पला जात होते.या हल्ल्यात कारचा चालक जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या दोन-तीन वर्षांत पाकिस्तानमध्ये (Pakistan) चिनी नागरिकांवर हल्ले वाढले आहेत. आतापर्यंत डझनहून अधिक हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेक चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक हल्ले खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान भागात झाले आहेत.
दासू शहर हे एका मोठ्या धरणाचे ठिकाण आहे आणि या भागावर यापूर्वीही हल्ले झाले आहेत. 2021 मध्ये बसमध्ये झालेल्या स्फोटात नऊ चिनी नागरिकांसह 13 लोकांचा मृत्यू झाला होता.