लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Elections) हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. माजी कॅबिनेट मंत्री रामलाल मारकंडा (Ramlal Markanda) यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधून भाजपध्ये सामील झालेले रवी ठाकूर यांना पक्षाने तिकिट दिल्याने रामलाल मारकंडा यांनी राजीनामा दिला आहे. तसंच आता रामलाल मारकंडा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू आहेत.
रवी ठाकूर यांना लाहौल-स्पीतीमधून भाजपचे तिकीट मिळाल्यामुळे हिमालचमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. यादरम्यान रामलाल मारकंडा आज (26 मार्च) लाहौल येथे पोहोचले आणि त्यावेळी त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह राजीनामा देण्याची घोषणा केली. तसेच मी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवू शकतो, असेही रामलाल मारकंडा यांनी सांगितले.
भाजपने आज सहा जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात भाजपने त्या चेहऱ्यांना स्थान दिले आहे, जे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले आहेत. यामध्ये भाजपचे बंडखोर काँग्रेस आमदार रवी ठाकूर यांना तिकीट देण्याच्या निर्णयावर लाहौल-स्पितीच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. तसेच कार्यकर्त्यांचे हित बाजूला ठेवून पक्षाने निर्णय घेतल्याचे मारकंडा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत धर्मशालामधून सुधीर शर्मा, लाहौल आणि स्पीतीमधून रवी ठाकूर (SC), सुजानपूरमधून राजिंद्र राणा, बडसरमधून इंद्रदत्त लखनपाल, गाग्रेटमधून चैतन्य शर्मा आणि कुतलाहारमधून देविंदर कुमार (भुट्टो) यांना उमेदवारी दिली आहे.