पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप घोष यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे की, भाजप नेते दिलीप घोष यांनी वैयक्तिक वक्तव्य करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे.
तत्पूर्वी, दुर्गापूर येथे पत्रकारांना संबोधित करताना भाजप खासदार दिलीप घोष म्हणाले की, ममता बॅनर्जी जिथे जातात तिथे त्या स्वतःला त्या राज्याची मुलगी म्हणवतात, पण त्यांनी स्वतःचे वडील ओळखले पाहिजेत. जेव्हा दीदी (मुख्यमंत्री ममता बॅनर्जी) गोव्याला जातात तेव्हा त्या स्वतःला गोव्याची मुलगी म्हणवतात. जेव्हा त्या त्रिपुराला जातात तेव्हा त्या म्हणतात की त्या त्रिपुराची मुलगी आहेत. त्यामुळे आधी त्यांनी स्वतःच्या वडिलांना ओळखायला हवे, ” असे वक्तव्य दिलीप घोष यांनी केले आहे.
तृणमूल काँग्रेसने निवडणूक संहितेच्या अंतर्गत कलमाचा हवाला दिला, ज्यात असे म्हटले आहे की, “कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने कोणत्याही कार्यात भाग घेऊ नये किंवा कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनावर हल्ला होईल असे कोणतेही विधान करू नये किंवा दुर्भावनापूर्ण किंवा शालीनता आणि नैतिकतेला धक्का पोहोचेल अशी विधाने करू नयेत.” तसेच सत्ताधारी बंगाल पक्षाने निवडणूक आयोगाला भाजप खासदार दिलीप घोष यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे.
“श्री घोष यांच्या टिप्पण्या केवळ शालीनतेच्या सीमा ओलांडत नाहीत तर सत्तेच्या पदांवर असलेल्या महिलांबद्दल गैरवर्तन आणि अनादराची संस्कृती कायम ठेवतात,” असे तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
भाजप नेत्याच्या या वक्तव्यावर टीएमसी नेत्यांकडून तीव्र टीका करण्यात आली आहे. “भाजप नेत्यांची अशी मानसिकता नारी शक्तीचा अपमान करते. त्यांनी यापूर्वी मां दुर्गाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यांनी ममता बॅनर्जींबद्दल जे काही बोलले त्याबद्दल त्यांना POCSO कायद्यांतर्गत अटक करावी”, असे TMC नेते कीर्ती आझाद म्हणाले.