आज (27 मार्च) सकाळी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने (UBT) लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी उडाली आहे. कारण काँग्रेस (Congress) नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) हे अमोल किर्तीकरांना उमेदवारी मिळाल्यामुळे संतापले आहेत.
संजय निरूपम म्हणाले की, शिवसेनेनं आज सकाळी मुंबईतील चार जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात शिवसेना 6 पैकी 5 जागा लढवणार आणि काँग्रेससाठी त्यांनी फक्त एक जागा सोडली आहे. काँग्रेसला गाडून टाकणारा हा निर्णय आहे. यासाठी मी शिवसेनेचा आणि वाटाघाटीत जे काँग्रेसचे लोक सामील होते त्यांचा निषेध करतो. एकेकाळी काँग्रेसचं मुंबईतील सहा जागांवर प्राबल्य होतं तिथे आज पक्षाला वाट्याला फक्त एक जागा येत असेल तर हा मुंबईतील काँग्रेसचं अस्तित्व संपवण्याचा घाट घातला जात आहे, अशी टीका निरूपम यांनी केली.
अमोल किर्तीकरांना उमेदवारी मिळताच संजय निरूपम म्हणाले की, शिवसेनेनं जो उमेदवार जाहीर केला आहे त्या अमोल किर्तीकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मोफत जेवण देण्याच्या योजनेमधून कंत्राटदाराकडून दलाली घेण्यात आली आहे. त्यामुळे मी अशा खिचडी चोराचे काम करणार नाही, असे निरूपम यांनी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस पक्षाने नेहमी भ्रष्टाचाराविरोधात ठोस भूमिका घेतली आहे. त्यामुळे आत शिवसेनेनं जाहीर केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या उमेदवाराच्या नावाबाबत आमच्या सर्वोच्च नेतृत्वाने आक्षेप नोंदवावा अशी मी अपेक्षा करतो. याबाबत मी आठवडाभर वाट पाहीन. तसंच मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझ्यासमोर आता सगळे पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या आठवड्याच तु्म्हाला घोषणा ऐकायला मिळू शकते, असे म्हणत संजय निरूपम यांनी काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.