ईडीने दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. कोर्टाने त्यांना ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान सुटकेसाठी केजरीवालांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काल त्या अरविंद केजरीवाल यांना तुरुंगांत भेटल्याचे म्हणाल्या. त्यांना मधुमेह असून त्यांची साखरेची पातळीही योग्य नाही. पण त्याची जिद्द कायम आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीचे मंत्री आतिशी यांना लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत असा संदेशही दिला होता.
सुनीता केजरीवाल पत्रकार परिषदेत म्हणाल्या, ”त्यांनी मला आणखी एक गोष्ट सांगितली की कथित दारू घोटाळा प्रकरणात ईडीने गेल्या 2 वर्षांत २५० पेक्षा जास्त हून अधिक छापे टाकले आहेत. ते या कथित घोटाळ्यातील पैशांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत टाकलेल्या एकाही छाप्यात एक पैसाही सापडला नाही. मनीष, सतेंद्र आणि संजय सिंह यांच्या घरावर छापा टाकण्यात आला मात्र एक पैसाही सापडला नाही. या कथित घोटाळ्यातील पैसा कुठे आहे? याचा खुलासा २८ मार्च रोजी न्यायालयासमोर करणार असल्याचे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या कथित घोटाळ्यातील पैसा कोठे आहे हे आम्ही संपूर्ण सत्य देशाला सांगू आणि त्याचे पुरावेही देऊ. ते एक अतिशय सच्चा, देशभक्त, निडर आणि धैर्यवान व्यक्ती आहेत.”
दरम्यान, ईडीने केजरीवाल यांच्या १० दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी केली होती. यावर तब्बल अडीच ते तीन तास कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर कोर्टाने केजरीवालांना ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. उद्या कोठडी संपल्यानंतर केजरीवालांना कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान यावेळी ईडी त्यांची अधिक कोठडी मागू शकते. कोर्टाने के. कविता यांना देखील ९एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.