वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज (27 मार्च) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आठ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबतचे संबंध तोडणार असल्याचं स्पष्ट होत आहे. पण, वंचित बहुजन आघाडीने अद्याप महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसोबतचे (Mahavikas Aghadi) संबंध तोडण्याचा आपला इरादा अधिकृतरित्या जाहीर केलेला नाही.
रामटेकसाठी आणखी एका उमेदवाराचे नाव दुपारी जाहीर केले जाईल, असे वंचित बहुजन आघाडीने सांगितले आहे. वंचित बहुजन आघाडीने गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर सारख्या जागांसाठी उमेदवारांची नावे दिली आहेत जिथे काँग्रेसने आधीच उमेदवार जाहीर केले आहेत. तर ठाकरे गटाने आज सांगली मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे.
मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीनंतर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर “वंचित बहुजन आघाडी राज्य समितीने नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितने नागपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देईल,” असे पक्षाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDA चा सामना करण्यासाठी महाविकास आघाडीसोबत युती करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्ष जोरदार प्रयत्न करत होता. तर उद्धव गटाचे नेते आणि प्रवक्ते आनंद दुबे म्हणाले की, “आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता. सर्व काही ठीक होते. आज उमेदवार जाहीर करून, त्यांनी भाजपला मागच्या दाराने मदत करण्याचे संकेत दिले आहेत. तसंच त्यांनी भाजपची बी टीम म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला नाही का?”, असा सवालही दुबेंनी उपस्थित केला आहे.
“आम्ही हे म्हणत नाही, जनता हा प्रश्न विचारत आहे. जर आपला संदेश भाजपला पराभूत करण्याचा आहे, तर आम्ही एकट्याने निवडणूक का लढवायची?,” असा प्रश्नही आनंद दुबेंनी VBA नेतृत्वाला विचारला आहे.