केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी टोल टॅक्सबाबत (Toll Tax) मोठी घोषणा केली आहे. सरकार लवकरच टोल टॅक्स वसुली प्रणाली पूर्णपणे बदलणार आहे. आता टोल प्लाझावर कर भरण्याऐवजी सॅटेलाइटवर आधारित टोल वसुली यंत्रणा राबवली जाणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना या नव्या प्रणालीचा आता फायदा होणार आहे. कारण ते जेवढे किलोमीटर प्रवास करतात त्यानुसार त्यांना पैसे द्यावे लागतील.
नागपुरातील एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “आता आम्ही टोल रद्द करत आहोत आणि सॅटेलाइटवर आधारित टोल वसुली यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. पैसे थेट तुमच्या बँक खात्यातून कापले जातील. तुम्ही ज्या रस्त्यावर प्रवास करता, त्यानुसार शुल्क आकारले जाईल. यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.
पूर्वी मुंबईहून पुण्याला जायला 9 तास लागत होते, आता ते २ तासांवर आले आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. यासोबतच पुढे ते भारतमाला प्रकल्पाबाबत म्हणाले की, “भारतमाला-1 प्रकल्प हा ३४ हजार किलोमीटरचा प्रकल्प आहे. आणि भारतमाला-2 ची लांबी 8500 किलोमीटर आहे. तर 2024 च्या अखेरीस या देशाचे चित्र पूर्णपणे बदलून जाईल.
राष्ट्रीय महामार्गांचे रस्त्यांचे जाळे अमेरिकेच्या बरोबरीने करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की मी त्यात यशस्वी होईन, असेही नितीन गडकरी म्हणाले.