सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात काल (27 मार्च) हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर चुरशीचा सामना रंगला. या सामन्यात दोन्ही संघ त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात होते. पण, शेवटी सनरायझर्स हैदराबादने दमदार कामगिरी करत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे सनरायर्झ हैदराबादने त्यांच्या विजयाचे खाते उघडले आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 3 गडी गमावून 277 धावा केल्या. तर मुंबई इंडियन्स संघाने पाठलाग करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 246 धावा केल्या.
कालच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आरसीबीचा 11 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला 278 धावांचे लक्ष्य दिले होते. 2013 मध्ये आरसीबीने 263 धावा केल्या होत्या, जी आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या होती. तर आता हा विक्रम मोडीत काढत सनरायझर्स हैदराबादने सर्वाधिक 277 धावा करत ऐतिहासिक विक्रम रचला आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला केवळ 246 धावा करता आल्या. टिळक वर्माने 64 धावांची खेळी केली. तर डेव्हिडने 42 धावांची नाबाद खेळी खेळली. जयदेव उनाडकट आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले. या सामन्यात 38 षटकार मारले गेले. हैदराबादने 18 षटकार तर मुंबईने 20 षटकार मारले.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
सनरायझर्स हैदराबाद- ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स , भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
मुंबई इंडियन्स- इशान किशन , रोहित शर्मा, नमन धीर, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका.