दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. तर त्यांना २१ मार्च रोजी त्यांना विशेष कोर्टाने ७ दिवसांची ईडी कोठडी दिली आहे. तर ईडीच्या अटकेविरुद्ध केजरीवालांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान अरविंद केजरीवालांची ईडी कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्यांना केजरीवालांना आज राउज एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने केजरीवालांच्या ईडी कोठडीत ४ दिवसांची वाढ केली आहे.
आज कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान ईडीने केजरीवालांच्या ७ दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी केली होती. दरम्यान कोर्टानं केजरीवाल यांना १ एप्रिल पर्यंत म्हणजे आणखीन ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीच्या वतीने एएसजी एसव्ही राजू आणि विशेष वकील जोहेब हुसैन हे व्हीसीमार्फत हजर झाले. केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रमेश गुप्ता न्यायालयात हजर झाले. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या हजेरीसाठी दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
ईडीने न्यायालयाला सांगितले की, काढलेल्या डिजिटल डेटाची चौकशी करणे आवश्यक आहे. एएसजी एसव्ही राजू यांनी सांगितले की, केजरीवाल यांचे म्हणणे रेकॉर्ड केले आहे, मात्र ते प्रश्नांची थेट उत्तरे देत नाहीत, सापडलेल्या डिजिटल डेटाचीही तपासणी केली जात आहे. यासाठी त्यांना ७ दिवसांची ईडी कोठडी हवी आहे. मात्र कोर्टाने ४ दिवसांची कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान आज दिल्ली पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. कोर्ट परिसरात देखील पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. या प्रकरणात आरोपी असलेल्या के.कविता यांना देखील कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.