लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अनेक नेते आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे विरोधी बाकावर असलेले महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) हे एकत्र येणार का? यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मविआचे नेते वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा करत मविआला मोठा धक्का दिला आहे. पण तरीही मविआकडून संयमाची भूमिका घेतली जात आहे. अशातच, आता साताऱ्यातील एका भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मविआ वंचितला सोबत घेणार नाही? अशा चर्चा सगळीकडे रंगल्या आहेत.
आज शरद पवार सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवारांनी साताऱ्यातील कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले की, आज मी साताऱ्यात मुद्दाम आलो आहे. कारण मला तुम्हा सर्वांसोबत संवाद साधायचा होता. तर साताऱ्यातील जागेसाठी एकापेक्षा अधिक लोक आग्रही आहेत. त्यामुळे आम्ही येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या जागेसाठी उमेदवाराची घोषणा करू.
श्रीनिवास पाटील यांनी आपली लोकसभेची उमेदवारी नाकारली आहे. याबाबत शरद पवारांनी सांगितले की, मी प्रकृतीमुळे निवडणूक लढवू शकत नाहीये. पण मी पक्षाचे काम करत राहणार आहे, असे आम्हाला श्रीनिवास पाटलांनी सांगितले आहे.
पुढे महाविकास आघाडीबाबत शरद पवार म्हणाले की, आम्ही एकत्र आलो असून आम्ही उमेदवारीबाबत चर्चा केली आहे. यावेळची निवडणूक तीन पक्षांनी एकत्र येऊन लढवायची आहे, असे पवार म्हणाले. पवारांच्या या वक्तव्यानंतर मविआ वंचितला सोबत घेणार नाही? अशी शक्यता वर्तवली जात आहे.