22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदींना रामलल्लाची मूर्ती पहिल्यांदा पाहिल्यानंतर काय वाटलं याबाबतचा खुलासा त्यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ज्यावेळी मी रामलल्लांची मूर्ती पहिल्यांदा पाहिली तेव्हा मला वाटलं की, जणू मला रामलल्ला सांगत आहेत की आता सुवर्णयुग आणि भारताची वेळ आली आहे.
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा मी रामलल्लांसमोर गेलो तेव्हा माझी पहिली नजर त्यांच्या पायावर पडली आणि दुसरी नजर त्यांच्या डोळ्यावर पडली. काही वेळ माझं लक्ष फक्त रामलल्लाकडे होतं. तसंच माझ्या मनात विचार आले की, रामलल्लाजी मला सांगत आहेत की आता सुवर्णयुग सुरू झाले आहे. भारताचे दिवस आले असून आता भारत पुढे जात आहे.
राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, अयोध्या ट्रस्टकडून मला निमंत्रण मिळाले होते. मला पंतप्रधान म्हणून अनेक आमंत्रण येतात पण या आमंत्रणाने मला धक्का बसला. मला अभिषेक सोहळ्याचे आमंत्रण मिळाल्यापासून मी अध्यात्मिक वातावरणात तल्लीन होऊ लागलो आहे. तसंच मी ठरवले आहे की, मी 11 दिवस धार्मिक विधी करीन आणि दक्षिणेतील प्रभू रामाशी संबंधित ठिकाणी वेळ घालवेन.