लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Elections) तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. पण अजूनही काही जागा रखडलेल्या आहेत. यामध्ये सातारा (Satara) हा एक मतदारसंघ असून त्यासाठी अजूनही उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. साताऱ्यात महायुतीकडून उदयनराजे भोसले लढण्यास इच्छुक आहेत, पण अद्याप भाजपने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. तर दुसरीकजे शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील यांनी साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता या जागी शरद पवार (Sharad Pawar) कोणाला लढवणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सध्या साताऱ्यातून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच पृथ्वीराज चव्हाण यांनीही शरद पवारांनी सांगितलं तर आपण लढण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, साताऱ्यातून माझ्या नावाची चर्चा सुरू नाहीये, कारण ही जागा शरद पवार गटाची आहे. माध्यमांनी माझं नाव घेतलं आहे. जर शरद पवारांनी आदेश दिला तर मी लढायला तयार आहे. हा निर्णय शरद पवारांचा आहे. मला पूर्ण खात्री आहे की, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीत जातीयवादी विचार येणार नाहीत त्यासाठी शरद पवार आणि आम्ही कटिब्ध आहोत.
सातारा मतदारसंघ शरद पवार गटाकडे आहे. त्यामुळे तिथला उमेदवार त्यांनी ठरवायचा आहे. शरद पवार सर्वात सक्षम उमेदवार कोण आहे हे ठरवतील. तसंच ते जो उमेदवार देतील त्याच्यासाठी ताकदीने काम करायची आमची तयारी आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.