वाराणसी येथील ज्ञानवापी येथील मशिदीच्या दक्षिणेकडील बाजूस तळघरात हिंदूंना पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्ञानवापी येथील प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यायालयाने काही दिवसांपूर्वी याबतीत एक मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार हिंदूंना आता ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करता येणार आहे. त्यानुसार तळघरामध्ये हिंदू समाजाकडून पूजा करण्यास सुरुवात झाली आहे . न्यायालयाने हिंदू याचिकाकर्त्यांना वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या पूर्वी सीलबंद तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान मुस्लिम पक्षकारांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने पूजेवर बंदी घालण्यास नकार दिला आहे.
तळघरातील पूजेवर बंदी घालण्याची मशीद समितीची मागणी फेटाळण्यात आली. मुस्लिम बाजूच्या याचिकेवर हिंदू पक्षालाही नोटीस बजावण्यात आली होती. आमच्या हस्तक्षेपाशिवाय स्थितीत कोणताही बदल केला जाणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुस्लिम पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आणि पूजेवर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली. यावर्षी ३१ जानेवारी रोजी वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर व्यासजी तळघरात पूजा सुरू करण्यात आली. त्यानंतर मुस्लीम पक्षाने उच्च न्यायालयात दाद मागितली, परंतु न्यायालयाने पूजेवर बंदी घालण्यास नकार दिला.
दरम्यान, ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात प्रवेश रोखण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स देखील हटविण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ASI च्या सर्वेक्षणाच्या वेळेस तळघर सील करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पत्रकारांशी संवाद साधताना हिंदू पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, ”हिंदू पक्षाला ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला ७ दिवसांच्या आत व्यवस्था करावी लागेल. आता प्रत्येकाला पूजा करण्याचा हक्क आहे.” चार महिला फिर्यादींनी उत्खनन आणि मशिदीच्या सीलबंद भागाचे सर्वेक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर काही दिवसांनी वाराणसी न्यायालयाचा हा आदेश आला आहे.