आयपीएल 2024 (IPL 2024) सुरू झाल्यापासून मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अद्यापही त्यांचं खातं खोललेलं नाहीये. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात असलेल्या मुंबई इंडियन्सला तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
काल (1 एप्रिल) मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरोधात (Rajasthan Royals) पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे यंदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. मुंबईच्या या खराब कामगिरीमुळे आता रोहिल शर्माला (Rohit Sharma) मुंबईचं कर्णधारपद पुन्हा देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
याबाबत माजी खेळाडू मनोज तिवारी याने क्रिकेटबजच्या कार्यक्रमात खळबळजनक दावा केला आहे. मनोज तिवारी म्हणाला की, मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद पुन्हा रोहित शर्माकडे जाऊ शकतं. कारण असा निर्णय घेताना मुंबई इंडियन्सचे मालक अजिबात संकोच करत नाहीत. आत्तापर्यंत रोहित शर्माने पाच वेळा चषक जिंकून दिला आहे, तरी देखील यंदा हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आत्ताची हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील कामगिरी पाहता पुन्हा एकदा रोहितकडे कर्णधारपद देताना मुंबईचा संघ संकोच करणार नाही. कर्णधार बदलणे हा खूप मोठा निर्णय आहे. मात्र, यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाहीये. त्यामुळे गुणतालिकेत मुंबईचा संघ एकदम खाली आहे. तसंच हार्दिकचं नेतृत्वही तितकं खास दिसत नाहीये, असेही मनोज तिवारी म्हणाला.
दरम्यान, मनोज तिवारीने केलेल्या या दाव्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तसेच आता मुंबई इंडियन्स रोहित शर्माला कॅप्टन्सी देणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.