लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये (Bihar) भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठा धक्का बसला आहे. बिहारमधील मुझफ्फरपूरमधील भाजप खासदार अजय निषाद (Ajay Nishad) यांनी तिकीट नाकारल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे अजय निषाद नाराज होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करण्यापूर्वी अजय निषाद यांनी आज (2 एप्रिल) भाजपच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी निषाद यांनी ट्विट करून भाजपचा राजीनामा जाहीर केला आणि आपली फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. राजीनामा जाहीर करताना अजय निषाद म्हणाले की, पक्षाने केलेल्या विश्वासघातामुळे मला धक्का बसला आहे. तर भारतीय जनता पक्षाने राजभूषण चौधरी यांना मुझफ्फरपूरमधून उमेदवार केले आहे. मुझफ्फरपूरमध्ये 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार असल्याची माहिती आहे.
भाजपला राजीनामा दिल्यानंतर अजय निषाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेडा, बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह आणि राज्य प्रभारी मोहन प्रकाश यांनी अजय निषाद यांचे पक्षात स्वागत केले. माजी केंद्रीय मंत्री जयनारायण निषाद यांचा मुलगा अजय निषाद म्हणाले, ‘मला कोणाचा तरी अहंकार तोडायचा आहे आणि माझा गमावलेला सन्मान परत मिळवायचा आहे.’ मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस अजय निषाद यांना मुझफ्फरपूरमधून उमेदवार घोषित करू शकते.
अखिलेश प्रसाद सिंह म्हणाले की, निषाद काँग्रेसमध्ये सामील झाल्यामुळे पक्षाला मुझफ्फरपूर आणि आसपासच्या भागातील अत्यंत मागासवर्गीय (ईबीसी) मतदारांचा पाठिंबा मिळेल आणि संघटनाही मजबूत होईल. तर निषाद म्हणाले की, सामाजिक न्यायाशी संबंधित राहुल गांधींच्या दूरदृष्टीने ते प्रभावित झाले आहेत.