राज्यासह देशात कुठे ऊन, कुठे पाऊस अशी स्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली बघायला मिळाली होती. मात्र एप्रिल सुरु होताच मात्र उकाड्यात वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आता वर्तवली आहे. तर हिमालयीन प्रदेशासह देशाच्या वायव्य भागात आज मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकण विभागात तुरळक पावसाचा अंदाज (Rain) वर्तवण्यात आला आहे. पाच एप्रिलपासून अवकाळीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पाच ते आठ तारखेला मध्य महाराष्ट्रामध्ये, तसेच सहा ते आठ तारखेला कोकण गोवा आणि मराठवाड्यात, सात आणि आठ तारखेला विदर्भामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुढील दोन-तीन दिवसांत राज्यात तापमानात वाढ होणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. विदर्भाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. मंगळवारी विदर्भात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे 42.3 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. वर्धा, यवतमाळ, वाशीम आणि अकोल्याचे तापमान 41 अंश सेल्सिअसच्या वर असल्याचे बघायला मिळाले होते.