भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज (3 एप्रिल) मुझफ्फरनगरमध्ये केंद्रीय मंत्री संजीव बल्यान यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत विरोधकांवर निशाणा साधला.
अमित शाह म्हणाले की, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा (Indi Alliance) हेतू आपल्या लोकांना पंतप्रधान आणि मुख्यमंत्री बनवणे हा आहे. पण, देशातील शेतकरी, गरीब, मजूर, दलित आणि आदिवासींना बळकट करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे हे नरेंद्र मोदींचे उद्दिष्ट आहे.
बुढाणा येथील नॅशनल इंटर कॉलेजच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत अमित शहा म्हणाले की, या निवडणुकीत जमलेल्या या अहंकारी आघाडीत 12 लाख कोटी रुपयांचे घोटाळे आणि भ्रष्टाचारात अडकलेले लोक जमले आहेत. मोदींनी मेरठमध्ये सभा घेतली त्याच दिवशी विरोधी आघाडीने भ्रष्टाचार रॅली काढली आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्याची चर्चा केली.
अखिलेश यादव यांचा पक्ष आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या अहंकारी आघाडीला अयोध्येत राम मंदिर बांधावे असे कधीच वाटले नाही. काँग्रेसने रामजन्मभूमीचा मुद्दा 70 वर्षे रखडला, लटकत ठेवला. पण मोदींनी केसही जिंकली, भूमिपूजन केले आणि 22 जानेवारीला रामलल्लाचा अभिषेक केला, असे अमित शाह म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, मोदींनी गरीब आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी खूप काम केले आहे. मोदींनी उसासाठी राष्ट्रीय धोरण बनवून गूळ आणि उसाच्या या क्षेत्रात बरेच बदल केले आहेत. बसपाच्या काळात 19 साखर कारखाने बंद पडले, अखिलेशच्या राजवटीत 10 साखर कारखाने बंद पडले, मात्र भाजपच्या काळात 20 हून अधिक साखर कारखाने सुरू झाले आणि 5 नवीन साखर कारखाने बांधण्याचे कामही आमच्या सरकारने केले आहे. तुम्हाला आठवत असेल, काँग्रेसचे सरकार असताना उसाचा भाव 210 रुपये प्रतिक्विंटल होता. आज ते 340 रुपये प्रति क्विंटल करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.
काश्मीरवर चर्चा करताना अमित शाह म्हणाले की, मोदींनी काश्मीरमधून दहशतवाद संपवण्याचे काम केले आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानच्या मायभूमीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच ही निवडणूक मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आहे, असेही शाह म्हणाले.