तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आज (4 एप्रिल) पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर आल्या आणि त्यांनी पतीचा संदेश वाचला. तुरुंगातून पाठवलेल्या केजरीवालांच्या संदेशाचे वाचन करताना सुनीता यांनी आभासी पत्रकार परिषदेत सांगितले की, केजरीवाल यांनी आमदारांना जनतेच्या सेवेत व्यस्त राहण्यास सांगितले आहे. मात्र, यादरम्यान एक गोष्ट घडली ज्यामुळे आता वादाला तोंड फुटले आहे. भाजपने आम आदमी पक्षावर जोरदार पलटवार केला आहे.
सुनीता केजरीवाल यांच्या पाठीमागील भिंतीवर भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंच्यामध्ये तुरुंगातील केजरीवालांचा एक फोटो दिसत आहे. आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच केजरीवाल यांचा फोटो दोन महापुरुषांमध्ये लावला आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
याबाबत दिल्ली भाजपच्या अधिकृत X हँडलवर लिहिले आहे की, ‘जेव्हा मनुष्यावर विनाश येतो, तेव्हा विवेकचा मृत्यू होतो. ही ओळ आजकाल तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. दारूची दलाली आणि घोटाळा करून तुरुंगात गेलेले मद्यसम्राट केजरीवाल आता शहीद भगतसिंग जी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी आपली तुलना करू लागले आहेत. शेवटी, कोणी इतके आत्ममग्न कसे असू शकते?
भाजप नेते कपिल मिश्रा म्हणाले, ‘बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांच्यासोबत अरविंद केजरीवाल यांचा फोटो लावणे अत्यंत चुकीचे आणि अपमानास्पद आहे. बाबासाहेबांच्या बरोबरीने दारू माफिया प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीचा फोटो लावणे लाजिरवाणे आहे. ‘आप’चा हा गुन्हा अक्षम्य आहे.
दरम्यान, सुनीता केजरीवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले की, “मी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल. आपचे केजरीवाल यांनी तुरुंगातून सर्व आमदारांना संदेश पाठवला आहे. मी तुरुंगात असल्यामुळे माझ्या दिल्लीकरांना त्रास होऊ नये. प्रत्येक आमदाराने परिसराचा दौरा करावा. त्यांना काही समस्या असल्यास त्यांना विचारा, त्यांनी जी काही अडचण असेल ती सोडवा. मी फक्त सरकारी विभागांचे प्रश्न सोडवण्याबद्दल बोलत नाही, बाकीचे प्रश्न सोडवायचे आहेत. दिल्लीचे दोन कोटी लोक माझे कुटुंब आहेत. माझ्या कुटुंबातील कोणीही कोणत्याही कारणाने दु:खी होऊ नये. देव सर्वांचे कल्याण करो.”