काल (5 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 17 व्या सामन्यात पंजाब किंग्जने (PBKS) गुजरात टायटन्सचा (GT) तीन गडी राखून पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 199 धावा केल्या तर हे आव्हान पंजाबने 19.5 षटकात सात विकेट गमावून पूर्ण केले.
पंजाबच्या या अतुलनीय विजयात शशांक सिंग आणि आशुतोष यांचे महत्त्वाचे योगदान होते. शशांक सिंग आणि आशुतोष यांनी सातव्या विकेटसाठी अवघ्या 22 चेंडूत 43 धावांची सामना जिंकणारी भागीदारी केली. आशुतोषने 17 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 31 धावा केल्या. शशांक सिंगने नाबाद 62 धावा केल्या.
गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिलने 89 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्याशिवाय साई सुदर्शनने 19 चेंडूत 33 धावा केल्या. गिलने 48 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकार मारले. या मोसमात पहिल्यांदा खेळणाऱ्या केन विल्यमसनने 26 धावा, ऋद्धिमान साहाने 11 धावा, विजय शंकरने आठ धावा आणि राहुल तेवतियाने 23 नाबाद धावा केल्या. गिलचे या मोसमातील हे पहिले अर्धशतक आहे. त्याचबरोबर कर्णधार म्हणून त्याचे हे पहिलेच अर्धशतक आहे. पंजाब किंग्जकडून कागिसो रबाडाने दोन तर हरप्रीत ब्रार आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार शिखर धवनने प्लेइंग इलेव्हनमध्ये सिकंदर रझाला संधी दिली आहे. लियाम लिव्हिंगस्टोनच्या दुखापतीनंतर रझाला संघात स्थान मिळाले आहे. दुसरीकडे डेव्हिड मिलर आज गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळत नसल्याने त्याच्या जागी केन विल्यमसनला संधी देण्यात आली आहे.