सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तामिळनाडू येथील एका प्रवाशाला नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 8.81 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली.जो चेन्नईचा रहिवासी असून युगांडा इथून परतत होता.
प्रवाशी युगांडाहून दोहा मार्गे कतार एअरवेजच्या फ्लाइटने आला आणि त्याच्या ताब्यातील कोणतीही वस्तू जाहीर न करता ग्रीन चॅनेलमधून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या या वागण्याने प्रवाशांची प्रोफाइलिंग करणाऱ्या कस्टम अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. डमी प्रोपेलर आणि दोन डिस्कसह त्याच्या सामानाची कसून तपासणी केली असता त्यात पांढरे आणि पिवळ्या रंगाची पावडर असल्याचे समोर आले. त्यानंतरच्या तपासण्यांमध्ये हे सिद्ध झाले की या पावडरमध्ये मेथाक्वॉलोन हा अंमली पदार्थ आहे.
जप्त करण्यात आलेले ही पावडर 2.937 किलो होती, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 8.81 कोटी आहे. चेन्नई येथील रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय प्रवाशाला नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. तस्करीच्या कारवायांशी त्याचा संबंध असल्याची अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.