पुण्यातील ससून रुग्णालय सतत चर्चेत राहणारे रुग्णालय आहे. आता पुन्हा एकदा ससून रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयात आयसीयूत उपचार घेणाऱ्या रुग्णाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू (Death) झाला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे रुग्णालयात नेमके काय सुरु आहे असा सवाल आता पुण्यातील नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणानंतर वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी ससून रुग्णालयाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी केलेली कृती पाहून सर्वचजण चकित झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी ससूनमध्ये उंदीर चावल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासन नक्की करते तरी काय? असा सवाल पुणेकर उपस्थित करत आहेत. आज वसंत मोरे यांनी रुग्णालयाला भेट दिली. वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांनी अनोखी शक्कल लढवत चक्क रुग्णालयाच्या डीनला उंदीर पकडण्याचा पिंजराच भेट दिला आहे. हे फोटो वसंत मोरेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत.
वसंत मोरे यांनी याबद्दल एक ट्विट केले असून, यात वसंत मोरे म्हणाले,” काल वंचित बहुजन आघाडी मधील माझा पहिलाच दिवस आणि आमच्या पुण्याच्या ससून हॉस्पिटल मधून बातमी आली अपघाताने जखमी झालेल्या तरुणाला ससून हॉस्पिटलच्या ICU विभागात ऍडमिट असताना त्या तरुणाला उंदराने चावा घेतल्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला म्हणून ससून रुग्णालयाच्या विरोधात हॉस्पिटलच्या मुख्य अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन त्यांना उंदराचे पिंजरे भेट देण्यात आले जर जबाबदार लोकांवर कारवाई केली नाही आणि आरोग्य बाबतीमध्ये निर्णय घेतले गेले नाहीत तर भविष्यात यापेक्षाही मोठाले पिंजरे आणून संबंधित अधिकाऱ्यांना पिंजऱ्यात कोण येतील असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिला.”
https://twitter.com/vasantmore88/status/1776091953383506002
आयसीयूत दाखल असलेल्या रुग्णाचा अपघात झाल्यामुळे तो ससूनमध्ये उपचार घेत होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याची प्रकृती खालावली होती. मात्र असे कशामुळे झाले याचा शोध घेतला असता त्याचा मृत्यू उंदीर चावल्यामुळे त्याची प्रकृती खालावली असल्याचे समोर आले. उंदराने शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेतल्याचे समजते आहे. त्यामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात संताप व्यक्त केला आहे. उंदीर चावून या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी देखील मान्य केले आहे.