उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (5 एप्रिल) इंदापुरात दाखल झाले आहेत. तर इंदापुरात आयोजित केलेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, सर्वांना न्याय मिळेल अशी व्यवस्था उभी करणार आहे. तसेच यावेळी फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीवरही भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कार्यकर्ता हा सैनिक असतो आणि त्यांचे एकच लक्ष असते की आपल्या सेनापतीसाठी आपल्याला लढायचे आहे. प्रत्येक सेनापतीचे काम असते की आपल्या सैनिकांना योग्य दिशा द्यायची, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना साहजिकच आहेत. तर आमच्या सर्व सैनिकांना आम्ही निश्चितपणे समजावून सांगू शकू. सर्वांना न्याय मिळेल अशी व्यवस्था आम्ही उभी करणार आहे.
सध्या आम्ही तीन पक्ष एकत्र आलो आहोत. विशेषत:आमची राष्ट्रवादीसोबत लढत झाली आहे, त्यामुळे समन्वय साधावा लागतो. आमचा समन्वय साधण्याचा निश्चितपणे प्रयत्न सुरू आहे. आमचा राष्ट्रवादीशी उत्तम समन्वय असून सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आपण दुष्काळाचे नियोजन केलं असून पाणी राखून ठेवले आहे. दुष्काळावरती आम्ही क्लोज अशा प्रकारचे मॉनिटरिंग करत आहोत. दुष्काळाच्याबाबत ज्या उपाययोजना गरजेच्या आहेत त्या आम्ही करत आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.