वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे गेल्या महिन्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंत्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्याचबरोबर ते ज्या वाहनातून जात होते ते वाहन बुलेट प्रूफ किंवा बॉम्ब प्रूफ नव्हते. असे पोलीस अहवालात म्हटले आहे.
26 मार्च रोजी, खैबर पख्तूनख्वा प्रांतातील दुर्गम बेशम भागात एका आत्मघाती बॉम्बरने चिनी अभियंत्यांच्या ताफ्याला लक्ष्य केले होते. याच प्रांतातील कोहिस्तान जिल्ह्यातील दासू जलविद्युत केंद्राच्या बांधकामाच्या ठिकाणी या अभियंत्यांना बसमध्ये नेले जात होते. या हल्ल्यात पाच चिनी नागरिक आणि त्यांच्या पाकिस्तानी ड्रायव्हरला जीव गमवावा लागला होता. k
या वृत्तानुसार, रविवारी पोलिसांनी या संदर्भात फेडरल सरकारला पाठवलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, ज्या बसला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले ती बस काराकोरम महामार्गावरील दुसऱ्या बसपासून 15 फूट अंतरावर जात होती आणि हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन चिनी अभियंत्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर धडकले तेव्हा ती 300 फूट खोल दरीत कोसळली.
चिनी प्रवाशांना घेऊन जाणारी बस ‘बुलेट प्रूफ’ किंवा ‘बॉम्ब प्रूफ’ नव्हती, असे पोलिस अहवालात नमूद करण्यात आले आहे. चिनी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. आत्मघातकी हल्लेखोराने वापरलेल्या वाहनाचे तुकडे पोलिसांनी जप्त केले आहेत. अशा प्रकारचा हा दुसरा पोलिस अहवाल आहे.
एका दिवसापूर्वी, पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी या घटनेच्या चौकशी अहवालात ‘बेजबाबदारपणा झाल्याचे ‘ उघड झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
हाजरा विभागाचे प्रादेशिक पोलीस अधिकारी, अप्पर कोहिस्तान आणि लोअर कोहिस्तानचे जिल्हा पोलीस अधिकारी, दासू जलविद्युत प्रकल्पाचे सुरक्षा संचालक, खैर पख्तुनख्वाच्या विशेष सुरक्षा युनिटचे कमांडंट यांच्यावर १५ दिवसांत कारवाई करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिल्याचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी सांगितलेआहे.
शरीफ यांनी शुक्रवारी सर्व पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांना देशातील विविध प्रकल्पांवर काम करणाऱ्या चिनी नागरिकांसाठी सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. .
दरम्यान, चीननेही या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त करत पाकिस्तानमधील विविध प्रकल्पांवर काम करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेची मागणी केली आहे.