लोकसभा निवडणुक (Loksabha Election 2024) येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण त्याआधीच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीसोबतची युती तोडली आहे. त्यांनी आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी देखील जाहीर केली आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत युती तोडल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. अशातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही पसंत केलं होतं, हुंड्याची चर्चाही करायची होती, असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) खोचक टोला लगावला आहे.
माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, आम्ही साक्षगंध होण्यापूर्वी पसंत केलं होतं, मग त्यांनी लग्नासाठी नकार का दिला? हुंड्यासाठी चर्चा देखील करायची होती. पण त्यांनी लग्न मोडलं, असं म्हणत वडेट्टीवारांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, तर यावर विजय वडेट्टीवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, गळ्याला फास लागला, बिचारे करणार तरी काय? संजय सिंगला फसवत बेजार केलं, या वयामध्ये अधिक त्रास सहन करण्यापेक्षा मानसिक त्रासामुळे बदल करण्याची भूमिका घेतली असेल, असं वडेट्टीवार म्हणाले.