बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) आज (8 एप्रिल) पुष्टी केली की त्याचा राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही विचार नाही आणि आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तो लढणार असल्याच्या अफवा फेटाळल्या.
‘मुन्ना भाई’ स्टार आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतो अशा अफवांचे खंडन करत संजय दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. “मी राजकारणात येण्याच्या सर्व अफवांना पूर्णविराम देऊ इच्छितो. मी कोणत्याही पक्षात सामील होणार नाही किंवा निवडणूक लढवत नाही. जर मी राजकीय क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला तर मी त्याची स्वत: घोषणा करेन,” असे संजय दत्तने ट्विट करत म्हटले आहे.
सोशल मीडियाच्या गॉसिपवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही संजयने चाहत्यांना केले आहे. “कृपया सध्या माझ्याबद्दलच्या बातम्यांमध्ये जे काही प्रसारित केले जात आहे त्यावर विश्वास ठेवणे टाळा,” असेही तो म्हणाला.
दरम्यान, संजय दत्त हा हरियाणाच्या कर्नालमधून काँग्रेस उमेदवार म्हणून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांदरम्यान त्याने ही पोस्ट केली आहे. संजय दत्तने राजकीय अफवांचे खंडन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2019 मध्ये त्याने महाराष्ट्राचे मंत्री महादेव जानकर यांच्या पक्षात सामील होण्याच्या दाव्याचे खंडन केले होते. संजय दत्तने प्रामुख्याने त्याच्या चित्रपट कारकिर्दीवर आणि वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित केले आहे.