आज गुढीपाडवा (Gudhi Padawa). आजपासून मराठी नवीन वर्ष सुरू होते. या दिवशी ब्रम्हध्वज आणि विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात शोभा यात्रा, मिरवणुका आणि अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राजकीय नेत्यांनी, कलाकारांनी राज्यातील जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आजचा दिवस हा नवे विचार घेऊन प्रगतीकडे वाटचाल करण्याचा दिवस आहे.
दरम्यान गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबई आणि उपनगर, पुणे आणि शहरांमध्ये ठिकठिकाणी शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आज दिवसभरात करण्यात आले आहे.
मुंबईच्या गिरगाव येथे होणारी शोभा यात्रा ही प्रसिद्ध आहे. आज गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर येथे शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभा यात्रेत अनेक सिने कलाकारांनी, राजकीय नेते मंडळींनी देखील हजेरी लावली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य राजकीय मंडळींनी देखील गुढी पाडव्याचा सण उत्साहात साजरा केला आणि जनतेला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.