भारतीय जनता पक्षाने (BJP) आज (10 एप्रिल) लोकसभा निवडणुकीसाठी 10वी यादी जाहीर केली आहे. या यादीत त्यांनी 9 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये भाजपने उत्तर प्रदेशातील बलिया येथून पक्षाचे राज्यसभा खासदार नीरज शेखर यांना उमेदवारी दिली आहे. (BJP Candidates List)
नीरज शेखर हे माजी पंतप्रधान चंद्र शेखर यांचा मुलगा आहेत. तर नीरज शेखर हे 2007 ते 2014 या काळात लोकसभा खासदार होते. तर पूर्वी त्याच्या वडिलांचा मतदारसंघ असलेल्या बलिया येथून ते SP चे प्रतिनिधित्व करत होते. 2014 मध्ये, शेखर हे त्यांच्या भाजप प्रतिस्पर्ध्याकडून निवडणुकीत पराभूत झाले आणि त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नीरज शेखर यांना सपाने उमेदवारी दिली नाही, त्यानंतर त्यांनी सपा सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला ज्याने त्यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठवले.
भाजपने गाझीपूरमधून पारस नाथ राय यांचे नाव दिले असून ते समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार अफजल अन्सारी यांच्याशी लढतील. तर भाजपने पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून आपला उमेदवार बदलला आहे. पक्षाने यापूर्वी आसनसोलमधून भोजपुरी स्टार पवन सिंग यांना उमेदवारी दिली होती, पण आता त्यांची जागा भाजपचे विद्यमान खासदार एसएस अहलुवालिया यांनी घेतली आहे.
भाजपने चंदीगडमधून संजय टंडन यांना उमेदवारी दिली आहे, तर बी.पी. सरोज यांना मच्छलीशहरमधून तिकीट देण्यात आले आहे. तसेच जयवीर सिंह ठाकूर हे समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या मैनपुरीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर कौशांबीतून विनोद सोनकर आणि फुलपूरमधून प्रवीण पटेल निवडणूक लढवणार आहेत. प्रयागराजमधून नीरज त्रिपाठी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकसभेच्या 543 जागांसाठी 19 एप्रिलपासून सात टप्प्यांत निवडणूक होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) 303 जागा जिंकल्या, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) फक्त 52 जागा मिळवू शकली.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) 282 जागा जिंकल्या, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) फक्त 44 जागा मिळवू शकली.