दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दारू घोटाळ्याप्रकरणात ईडीच्या अटकेत आहेत. २१ मार्च रोजी ईडीने त्यांना अटक केली आहे. सध्या १९ एप्रिलपर्यंत केजरीवाल न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान ईडीच्या अटकेविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तसेच या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने तातडीने याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. आता सोमवारी केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे.
मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अपीलावर तात्काळ सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष खंडपीठ स्थापन करण्यास नकार दिला आहे. दरम्यान ईडीच्या अटकेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अरविंद केजरीवाल यांना कोर्टरूममध्ये विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चौकशीदरम्यान अजिबात सहकार्य केले नाही, असे सांगून ईडीने केजरीवाल यांना १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.