उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती (Mayawati) यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा झटका बसला आहे. कारण आता पक्ष सोडलेल्या खासदारांच्या यादीत मलूक नागर (Malook Nagar) यांचेही नाव जोडले गेले आहे. बिजनौरचे खासदार मलूक नागर यांनी राजीनामा दिला आहे. ते म्हणाले की, गेली 39 वर्षे माझे कुटुंबीय विविध राजकीय पक्षात आहेत. पहिल्यांदाच मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही, त्यामुळे मी नव्या राजकीय स्थळी जात आहे. यासोबतच गुरुवारी जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत त्यांनी आरएलडीमध्ये प्रवेश केला.
बसपा प्रमुख मायावती यांना मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौरचे खासदार मलूक नागर यांनी बसपचा राजीनामा दिला आहे. मलूक नागर म्हणाले, “घरी बसता येत नसल्याने मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मला देश आणि जनतेसाठी काम करायचे आहे.”
पुढे ते म्हणाले की, गेली 39 वर्षे माझ्या कुटुंबातील सदस्य ब्लॉक प्रमुख ते जिल्हा पंचायत, आमदार, खासदार निवडून आले आहेत. कुणालाही आमदारकीसाठी उमेदवारी दिली नाही किंवा खासदारकीचे तिकीटही देण्यात आले नाही, असे प्रथमच घडत आहे. मायावतींनी नागर यांचे तिकीट रद्द करून चौधरी विजेंद्र सिंह यांना बिजनौरमधून उमेदवारी दिली आहे.
दरम्ययान, आरएलडी कार्यालयात जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत मलूक नागर यांनी पक्षात प्रवेश केला. जयंत यांनी स्वागत करून आता मलूक नागर आमच्या पाठीशी असल्याचे सांगितले. प्रत्येक जागेवर ते प्रचार करणार आहेत. त्यांच्या एकत्र येण्याने आमचा पक्ष मजबूत होईल, असेही जयंत चौधरी म्हणाले.